Home Breaking News अधिष्ठात्यांच्या निर्णयाविरोधात शेकडो कामगारांची जिल्हा कचेरीवर धडक

अधिष्ठात्यांच्या निर्णयाविरोधात शेकडो कामगारांची जिल्हा कचेरीवर धडक

17
0
१६० कंत्राटी कामगारांना कामावरुन कमी करण्याचे आदेश; वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार, कोरोना काळात दिली अविरत सेवा
यवतमाळ :
कोरोना काळात अविरत सेवा देणाऱ्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १६० कंत्राटी कामगारांना महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे यांनी कामावरून कमी करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. या अन्यायाच्या विरोधात शेकडो कामगारांनी मंगळवारी २४ नोव्हेंबरला मनसेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
अत्यंत भयानक परिस्थितीत कोरोना रुग्णांचे मृतदेह उचलणे, शौचालय साफ करणे, त्यांची काळजी घेणे यासह सर्व कायम स्वरूपी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम कमी रोजंदारीत करणाऱ्या या १६० कामगारांना अधिष्ठाता कांबळे यांनी तडकाफडकी कामाहुन कमी केले. वास्तविक कोरोना वाढण्याची शक्यता पाहता या कामगारांची गरज असतांना सुद्धा त्यांना का कमी करण्यात आले असा सवाल या कामगारांनी अधिष्ठाता यांना विचारले. मात्र, अधिष्ठात्यांनी मी माझ्या मनाने पाहिजे त्यांना ठेवील अशा प्रकारचे उत्तर या कामगारांना दिले. एकीकडे त्यांचा २ महिन्यांचा पगार सुद्धा त्यांना देण्यात आला नव्हता, त्यांची दिवाळी ही अंधारात गेली आता तर त्यांना कामाहून कमी करण्यात आले आणि त्यांच्या जागी नव्याने आपल्या मर्जीतील लोकांना अधिष्ठाता ठेवत आहे असा आरोप कामगारांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केला.
या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांनी जिल्हाधिकारी यांना या कामगारांना न्याय द्यावा अन्यथा मनसे या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेईल असा इशारा दिला. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाचा अहवाल घेऊन या कामगारांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी मनसेचे अनिल हमदापुरे, विकास पवार, अमित बदनोरे, विलास बट्टावार, परीक्षित राणे, मयूर मेश्राम यांच्यासह शेकडो कामगार, युवक, महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here