Home Breaking News यवतमाळ जिल्ह्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

यवतमाळ जिल्ह्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

42
0

बसस्थानक चौकात विविध पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन केली जोरदार निदर्शने

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यातही मोठा पाठिंबा मिळाला आहे. त्यात मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला प्रतिसाद देत यवतमाळ येथील बसस्थानक चौकात विविध पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका दिल्लीतील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. त्याच्या या निर्णयाला यवतमाळ जिल्ह्यातही पाठिंबा देण्यात आला आहे.

गेल्या दहा दिवसांपासून हजारोंच्या संख्येने एकत्र आलेले शेतकरी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यातच या आंदोलकांनी मंगळवारी भारत बंदची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत संपुर्ण यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करुन कडकडीत बंद पाळण्यात आला.यवतमाळ शहरात मंगळवारी सकाळपासूनच व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली. दुपारी सर्व प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विविध संघटनांनी बसस्थानक चौकात एकत्र येत निदर्शने सुरू केली. त्या ठिकाणी सुमारे २ तास रास्तारोको आंदोलनही करण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी शहरात दुचाकीवरून रॅली काढुन व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. त्यानंतर बसस्थानक चौकात पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी मोदी विरोधी नारेबाजी करुन निषेध नोंदवण्यात आला. यावेळी महा विकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले.

या आंदोलनात काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, बाळासाहेब मांगूळकर, प्रदीप डंभारे, जितेश नावडे, उमेश इंगळे, राजु गिरी, घनश्‍याम अत्रे, डॉ. चेतन दरणे,  राजू गवळी, दत्ता हाडके, अनिल चावरे, अरुण ठाकूर, नईम पहेलवान, जावेद अन्सारी, गोलू जोमदे, देवानंद पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, वसंतराव घुईखेडकर, मनीष पाटील, प्रवीण देशमुख, चंदु चौधरी, विशाल पावडे, महेश पवार, प्रा.. घनशाम दरणे, स्वाती येंडे, वर्षाताई निकम, क्रांती धोटे, उषा दिवटे, सागर पुरी, वैशाली पावडे यांच्यासह इतर आंदोलक सहभागी होते.

शेतकरी पुत्र संघर्ष समितीने जाळला मोदींचा प्रतिकात्मक पुतळा

यवतमाळ : भारत बंदच्या अनुषंगाने यवतमाळमधील नवीन बसस्थानक चौकात शेतकरी पुत्र संघर्ष समितीने चक्क पंतप्रधान मोदींचा निषेध करीत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

अत्यावश्यक वस्तु व सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमन मुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक अशी तीन नवीन विधेयके पारित केले. या विधेयकांचा परिणाम संपुर्ण देशामधील शेतकऱ्यांवर होणार असून केंद्र सरकारच्या तीन काळ्या अध्यादेश शेतकरी व शेतमजुरांवर घातक प्रहार आहे. त्यामुळे त्यांना एमएसपी हक्कही मिळणार नाही. तसेच नाईलाजाने शेतकऱ्यांना त्यांची जमिन भांडवलदारांना विकावी लागेल. केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधातील एक षड्यंत्र आहे.

यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असुन जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या प्रकोपामुळे हवालदिल झाला आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

जिल्ह्यात बोंडअळीच्या प्रकोपामुळे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. याकरता बोंडअळीग्रस्त कुटुंबांना मदत मिळावी. तसेच कृषी विधेयक कायदा रद्द करण्यात यावा, आदी मागण्या शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे संयोजक तथा नगरसेवक नितीन मिर्झापूरे, चंद्रशेखर चौधरी, अंकुश वानखडे, उमेश इंगळे, मुकेश देशभ्रतार, प्रदीप डंभारे, अतुल राऊत, अरूण ठाकूर, घनश्याम अत्रे, रूपेश सरडे, ललित जैन, अजय गांवडे, श्रष्टी दिवटे, शुभम लांडगे, प्रद्युम जावळेकर, आदींसह शेकडो शेतकरी पुत्र उपस्थित होते.

 

आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांचाही बंदला पाठिंबा

यवतमाळ : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग संपुर्ण देशात पसरत आहे. त्यातच मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनाला संपुर्ण देशातून पाठिंबा मिळाला. व्यवस्थेच्या याच दुर्लक्षितपणाचे बळी ठरलेल्या जिल्ह्यातील बोथ बोडन या गावातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त परिवारातील महिलांनीही मंगळवारी दुपारी त्यांच्याच गावात आंदोलन करुन दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांच्या या आंदोलनातील सहभागामुळे जिल्ह्यातील इतर आंदोलकांना मोठी ऊर्जा मिळाली.

जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बोथबोडन या गावांमध्ये झाल्या आहे. राज्य व केंद्र शासनाने अनेक योजना शेतकऱ्यांसाठी लागू केल्या. मात्र, त्याचा कुठलाच फायदा या शेतकऱ्यांना झाला नाही. त्यामुळे या गावात आतापर्यंत २९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर नुकतेच केंद्र शासनाने पारित केले कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याने पुन्हा देशोधडीला लागणार आहे. या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. यात आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी हे ठिय्या आंदोलन करून दिल्लीच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे.केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब, हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी या ठिकाणी जाऊन आंदोलन करीत आहेत. मात्र, ग्रामीण भागात असलेल्या या शेतकरी कुटुंबातील महिला दिल्लीमध्ये आंदोलनाला सहभागी होऊ शकत नाही. मात्र, त्यांनी गावातूनच एक आंदोलन करून या कृषी कायद्याची होळी केली. आणि जोपर्यंत हा कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत या आंदोलनाला समर्थन राहणार असल्याचा निर्धार या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here