Home Breaking News पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची उद्या वर्षावर बैठक.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची उद्या वर्षावर बैठक.

172
0

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपानंतर वनमंत्री संजय राठोड हे गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळमधील त्यांच्या निवासस्थानीही ते नाहीत. त्यामुळे राठोड नेमके गेले कुठे? असा सवाल केला जात आहे. या प्रकरणावर कोणतीही कारवाई न झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही बोट दाखवले जात आहे. आता या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष घालणार असून उद्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या प्रकरणावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल-

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. “या प्रकरणाची नीट चौकशी करण्यात येईल. जे सत्य आहे तेच जनतेसमोर येईल. ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही महिने आपल्या असे लक्षात आले आहे की आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे असादेखील प्रयत्न होता कामा नये. त्याचबरोबर सत्य लपवण्याचा देखील प्रयत्न होऊ नये. त्यामुळे जे सत्य असेल ते चौकशी झाल्यावर जनतेसमोर येणार” असेही मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले.
पुढील निर्णयासाठी असू शकते बैठक-

वनमंत्री संजय राठोड हे नॉट रिचेबल झाले. नेमकं प्रकरण काय आहे, हे कळायला मार्ग नाही. राठोड हे शिवसेनेचे मंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही विरोधकांकडून टीका होत आहे. राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी जोरदार मागणी विरोधकांकडून होऊ लागली आहे. राठोड प्रकरणावरून शिवसेना बॅक फुटला आली आहे.

कोण आहेत संजय राठोड-
संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं. संजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली. शिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती.

काय आहे प्रकरण –

पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती, अशी माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here