Home Breaking News संचारबंदीच्या कालावधीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ …

संचारबंदीच्या कालावधीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ …

232
0

प्रतिबंधित क्षेत्र वगळता सदर आदेश संपूर्ण जिल्ह्यात लागू.
यवतमाळ, दि. 16 : जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित यवतमाळ जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासाठी नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र हे आदेश प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू होणार नाही.
सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बाजारपेठेच्या वेळेनुसार नियमितपणे सुरु राहतील. नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रातील ज्या उद्योगांना सुरु ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे ते सर्व उद्योग सुरु ठेवण्याकरीता परवानगी राहील. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आरोग्य व वैद्यकीय कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एन.आय.सी. अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एन.वाय.के. बँका सेवा वगळून) ई. मंजूर पदाच्या 50 टक्के प्रमाणात सुरु राहतील.
धार्मिक स्थळामध्ये उपलब्ध जागा आणि सामाजिक अंतराचा विचार करून एका तासामध्ये किती भक्तांना प्रवेश देता येईल याचे नियेाजन करून भक्तांना प्रवेश द्यावा. ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरीता जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा. सर्व सिनेमागृहे (सिंगल स्क्रिन ॲन्ड मल्टीप्लेक्स) हॉटेल्स, उपहारगृहे 50 टक्के उपस्थितीत खालील अटीच्या अधीन राहून सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. योग्य पध्दतीने मास्क घातल्याशिवाय प्रवेश असणार नाही. अंगात ताप असलेल्या व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार नाही. यासाठी आवश्यक तपासणी यंत्रणा ठेवणे आवश्यक आहे. सॅनिटायझरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. या नियमाचे उल्लंघन करणारी चित्रपटगृहे, हॉटेल, उपहारगृहे ही केंद्र सरकार कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना मालकाविरुध्द दंड आकारण्यात येईल व कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
शॉपींग मालकांनी खालील अटींचे पालन करणे आवश्यक आहे. योग्य पध्दतीने मास्क घातल्याशिवाय प्रवेश असणार नाही. अंगात ताप असलेल्या व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार नाही. यासाठी आवश्यक तपासणी यंत्रणा ठेवणे आवश्यक आहे. सॅनिटायझरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. लग्न समारंभाकरीता 50 व्यक्तींना परवानगी देण्यात येत आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालयाच्या मालकांविरुध्द दंड आकारण्यात येईल. लग्न समारंभाकरीता तहसिलदार, मुख्याधिकारी यांचेकडून परवानगी अनुज्ञेय राहील. अंत्यविधीकरीता 20 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी राहील. ह्याची पाहणी करण्याची जबाबदारी नगर परिषद, नगर पंचायत व ग्राम पंचायतीच्या सचिवांची राहील. गृह विलगीकरणास खालील अटीवर मुभा देण्यात येत आहे.
गृह विलगीकरणाची माहिती स्थानिक संस्थेस तसेच गृह विलगीकरण ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षेत येते त्यांना देण्यात यावी. गृह विलगीकरण मंजूर केलेल्या घराचे दारावर 14 दिवस कोविड रुग्ण असल्याबाबतचा फलक लावण्यात यावा. जेणेकरून तेथे कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे इतरांना कळेल. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारण्यात यावा. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या कुटुंबियांनी बाहेर फिरु नये. तसेच त्यांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधीत रुग्णास तात्काळ कोविड सेंटरमध्ये हलविण्यात येईल. सर्व प्रकारची शैक्षणीक कार्यालये (महाविद्यालय, शाळा) येथील अशैक्षणीक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे ई. कामाकरीता परवानगी अनुज्ञेय राहील.
मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरु राहील आणि वाहतूकसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करतांना चार चाकी गाडीमध्ये चालका व्यतिरिक्त इतर तीन प्रवासी अनुज्ञेय राहतील. तीन चाकी गाडी (उदा.ॲटो) मध्ये चालका व्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेलमेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतरजिल्हा् बसवाहतूक करतांना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी सह सोशल डिस्टन्सींग व निर्जतुकीकरण करून वाहतूकी करीता परवानगी अनुज्ञेय राहील. याकरीता विभागीय, नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, यवतमाळ यांनी नियोजन करावे.
ठोक भाजीमंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरु राहील. परंतु सदर भाजी मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांना प्रवेश राहील. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व सामाजिक, राजकीय व धार्मीक कार्यक्रम बंद राहतील. सकाळी 8.30 वाजेपावेतो मॉर्निंगवॉक व व्यायामास सुट राहील. परंतू मॉर्निंगवॉक व व्यायाम करतांना एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमनार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व जिम सकाळी 8.30 पर्यंत व सायंकाळी 6 ते 8.30 पर्यंत सुरु राहतील. जिम सुरु असतांना त्या ठिकाणी एकाच वेळी 10 पेक्षा जास्त व्यक्ती राहणार नाही. तसेच त्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक राहील.
सदर आदेश दिनांक 31 मार्च 2021 च्या मध्यरात्री पावेतो लागू आहे. सदर आदेशाच्या कालावधीत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपावेतो संचारबंदी लागू करण्यात येत आहे. 21 फेब्रुवारी 2021 अन्वये यवतमाळ जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पुढील आदेशापावेतो लागू राहील. जे वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.
००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here