Home Breaking News केंद्रीय पथकाची सुपर स्पेशालिटी व प्रतिबंधित क्षेत्राला भेट..

केंद्रीय पथकाची सुपर स्पेशालिटी व प्रतिबंधित क्षेत्राला भेट..

74
0

यवतमाळ, दि. 8 : वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व शहरातील जय- विजय चौक येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली.
राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे प्राध्यापक डॉ. जयंत दास आणि राम मनोहर लोहिया हॉस्पीटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देवांग भारती या केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी दुपारच्या सत्रात वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल), सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व येथे कार्यरत असलेल्या लसीकरण केंद्राची पाहणी केली. लॅबमध्ये आरटीपीसीआर टेस्टींग करण्यासाठी किती मशीन आहेत, एका मशीनची टेस्टिंगची क्षमता किती तसेच येथील लसीकरण केंद्रामध्ये रोज किती जणांना लस दिली जाते, सुपर स्पेशालिटीमध्ये एकूण बेडची क्षमता किती, दोन बेडमधील अंतर शासनाच्या सुचनेनुसार आहे का, लसीकरण नोंदणीबाबत काही अडचण निर्माण झाली का, आदींबाबत विचारणा केली.
तत्पूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केंद्रीय पथकातील सदस्यांना कोरोना परिस्थितीची माहिती देतांना अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयात सद्यस्थितीत 577 बेड असून यापैकी 490 बेड ऑक्सीजन सुविधेचे आहेत. तसेच महाविद्यालयात 80 बेड आयसीयुचे असून 66 व्हेंटीलेटर पॉईंटस् आहेत. येथील लॅबमध्ये आतापर्यंत 1 लक्ष 42 हजार 580 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून यापैकी 23690 जण पॉझेटिव्ह आले आहेत. महाविद्यालयाला रोज 900 जंबो सिलींडरची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. मृत्यु विश्लेषणाबाबत माहिती देतांना डॉ. बाबा येलके यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 602 मृत्यु झाले असून यापैकी 436 पुरुष आणि 166 महिला आहेत. सर्वाधिक 196 मृत्यु सप्टेंबर 2020 या महिन्यात झाले, त्यांनतर मार्च 2021 मध्ये 163 मृत्यु झाले आहे. मृत्यु झालेल्या 602 जणांपैकी 152 जण रेफर, 420 जण थेट वैद्यकीय महाविद्यालयात दाखल तर 30 ब्रॉड डेथ असल्याचे डॉ. येलके यांनी सांगितले.
बैठकीला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, डॉ. बाबा येलके, डॉ. विवेक गुजर, डॉ. विनय धकाते, डॉ. राजेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, डॉ. विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
जय विजय चौकातील प्रतिबंधित क्षेत्राला भेट : शहरातील जय-विजय चौकातील प्रतिबंधित क्षेत्राला केंद्रीय पथकाने भेट देऊन पाहणी केली. या प्रतिबंधित क्षेत्रात किती जण पॉझेटिव्ह आहे, अशी विचारणा केली असता दोन घरांमध्ये पाच जण पॉझेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कसा केला जातो. त्यांची नियमित तपासणी होत का, हे प्रतिबंधित क्षेत्र कधीपासून करण्यात आले. शेवटचा पॉझेटिव्ह रुग्ण कधी आला, याबाबत त्यांनी विचारणा केली.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here