Home Breaking News ….तर दुकानांवर होणार 50 हजार रुपयांचा दंड! !

….तर दुकानांवर होणार 50 हजार रुपयांचा दंड! !

208
0

 ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवीन मार्गदर्शक सुचना
यवतमाळ, दि. 8 : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 9 मे च्या सकाळी 7 वाजतापासून 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. यासदंर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश पारित केले आहे. विशेष म्हणजे अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू असल्यास तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने दिलेल्या वेळेनंतरही नियमांचा भंग करून उघडले असल्यास त्यांच्यावर 50 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
नवीन मार्गदर्शक सुचनेनुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक, वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी राहील. सर्व किराणा दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी खाद्यपदार्थांची दुकाने (ज्यात चिकन, मटन, मच्छी, अंड्यांची दुकाने) सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरू राहील. आठवडी बाजार, पारंपरिक भाजीबाजाराची दुकाने, रस्त्यावर थांबून भाजीपाला व फळे विक्री करण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. तथापी सोसायटी, कॉलनी व गल्लीमध्ये जाऊन भाजीपाला व फळे विक्री करण्यास सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत मुभा राहील.
कृषी सेवा केंद्र, बी-बियाणे, खते, किटकनाशक विक्री केंद्र सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत प्रत्यक्ष सुरू राहील. अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू असल्यास तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने दिलेल्या वेळेनंतरही नियमांचा भंग करून उघडले असल्यास त्यांच्यावर 50 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच सदर आस्थापना कोव्हीड – 19 आजाराची अधिसुचना अंमलात असेपर्यंत बंद करून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. लग्न समारंभ घरगुती स्वरुपात 25 लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेत पार पाडावे. संबंधित तालुक्यांचे तहसीलदार यांच्याकडून लग्नाची रितसर परवानगी घ्यावी लागेल. नियम व अटी शर्तीचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सर्व खाजगी, शासकीय / निमशासकीय कार्यालये बंद राहतील. अत्यावश्यक सेवेची कार्यालये (उदा. महसूल, आरोग्य, नगर परिषद / नगर पंचायत, विद्युत, पाणी पुरवठा, ग्रामपंचायत) सुरू राहतील. शासकीय कार्यालयात अभ्यागतांना बंदी राहील. कार्यालयात अभ्यागत आढळून आल्यास त्याच्यावर स्थानिक प्रशासनाकडून 200 रुपये दंड आकारण्यात येईल व संबंधित कार्यालय प्रमुखावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या समस्या, तक्रारी, निवेदने ई-मेल, व्हॉट्सॲप, दूरध्वनीने घेण्याचे नियोजन करावे. अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय विनाकारण घराबाहेर पडणा-यांकडून 200 रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच अशा लोकांची पथकाकडून कोव्हीड चाचणी करून अहवाल पॉझेटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तिची रवानगी सीसीसी मध्ये करण्यात येईल व त्यासाठीचा येणारा खर्च त्यांच्याकडून वसूल केला जाईल.
याशिवाय ब्रेक द चेन अंतर्गत 22 एप्रिल 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये वरील बाबींच्या सुधारणा करण्यात आल्या असून उर्वरीत मार्गदर्शक सुचना व घालून देण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. सदर आदेश हे 9 मे च्या सकाळी 7 वाजतापासून 15 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील.
सदर आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता चे कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियमाअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here