Home Breaking News तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद परिसरात महिला व बालविकास...

तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद परिसरात महिला व बालविकास भवन साठी दोन कोटींचा निधी बांधकाम विभागास वितरित.

102
0

यवतमाळ – जिल्ह्यातील महिला व बालकांच्या उत्थानासाठी योजना राबविणाऱ्या अंगणवाडी, आशा सेविका या यंत्रणेत महिलांची संख्या लक्षणीय आहे. या महिला यवतमाळ येथे जिल्हा परिषदेत प्रशासकीय कामासाठी आल्यानंतर त्यांची बैठकींपासून विश्रांतीपर्यंत होत असलेली अडचण लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा परिषदेच्या परिसरात महिला व बालविकास भवन निर्मितीची संकल्पना मांडली होती. यासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश महिला व बालविकास प्रशासनास दिले होते. या प्रस्तावास मान्यता मिळाल्याने जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या परिसरात भव्य महिला व बालविकास भवन बांधण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक लोकाभिमूख निर्णय घेऊन जिल्हा परिषदेत जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची सूचना तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांच्यासह सर्व जि.प सभापतींना केल्या. जिल्हा परिषदेत कोणत्या गोष्टींची तातडीने गरज आहे, याचा अहवाल मागविला. तेव्हा महिला व बालविकास विभागात जिल्हाभरातून विविध कामांसाठी येणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या बैठका घेण्यासाठी, प्रशिक्षणासाठी, त्यांच्या विश्रांतीसाठी कक्ष नसल्याची बाब प्रकर्षाने पुढे आली. त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महिला व बालविकास भवनची निर्मिती करण्याची कल्पना संजय राठोड यांनी मांडली होती. तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यावेळी महिला व बालविकास विभागासह, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात येऊन महिला व बालविकास भवनाच्या बांधकामासाठी दोन कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. हा निधी नुकताच जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. १ यांच्याकडील प्रशासकीय मान्यताप्राप्त योजनेत महिला व बालविकास भवनच्या बांधकामासाठी वितरित करण्यात आला. या महिला व बालविकास भवनच्या निर्मितीमुळे जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त येणाऱ्या महिला, महिला कर्मचारी, या महिलांसमवेत असलेली लहान मुले यांना क्षणभर विश्रांतीसाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here