Home Breaking News म्युकरमायकोसिसग्रस्तांच्या औषधींचा तुटवडा पडायला नको.. आमदार संजय राठोड

म्युकरमायकोसिसग्रस्तांच्या औषधींचा तुटवडा पडायला नको.. आमदार संजय राठोड

91
0

यवतमाळ –  कोविड पश्चात होणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ आजाराने सध्या डोके वर काढले आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही या आजाराने ग्रासलेले काही रूग्ण दाखल आहेत. या रूग्णांची थेट वॉर्डात जाऊन विचारपूस करून आमदार संजय राठोड यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज पाच तास घालविले. यावेळी त्यांनी म्युकरमायकोसिस वॉर्डासह, बालकांसाठी तयार करण्यात येत असलेल्या कोविड उपचार वॉर्डाची पाहणी केली. या भेटीत आ. संजय राठोड यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील कोविड संसर्गाच्या सद्यस्थितीची माहिती घेऊन अनेक उपयुक्त सूचना केल्या. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून कोविडचा प्रकोप सुरू असून संजय राठोड यांनी या काळात वैद्यकीय सेवेसह विविध सामाजिक उपक्रमांतून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ते सातत्याने कोविड रूग्णांची थेट कोविड उपचार वॉर्डात जाऊन भेट घेत विचारपूस करीत आहे. आतापर्यंत त्यांनी १२ वेळा वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डात भेट दिली. सध्या जिल्ह्यात कोविड पश्चात होणारा बुरशीजन्य म्युकरमायकोसिस आजार फोफावला आहे. काळी बुरशी व आता पांढरी बुरशी या आजाराने कोविड होऊन गेलेले रूग्ण बेजार झाले आहेत. या रूग्णांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काय व्यवस्था आहे, त्यांच्यावर उपचारासाठी औषधांचा पुरेसा साठा आहे की नाही, आदी बाबत माहिती घेण्यासाठी संजय राठोड हे आज शुक्रवारी सकाळी वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले.

 

यावेळी त्यांनी म्युकरमायकोसिस आजार झालेल्या रूग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस करीत त्यांना दिलासा दिला. या रूग्णांवर शस्त्रक्रियेची गरज असल्यास त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या. तसेच या आजारासंबधी लागणाऱ्या औषधींचा तुटवटा पडायला नको, त्यामुळे या औषधी तातडीने मागवून स्टॉकमध्ये ठेवण्याच्या सूचना केल्या. यावेळी संजय राठोड यांनी महाविद्यालयात बालकांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या बाल कोविड उपचार वॉर्डासह महिलांसाठी तयार करण्यात आलेला अतिरिक्त उपचार कक्ष, हेवतून ऑक्सीजन घेणारा प्लांट, लिक्वीड ऑक्सीजन प्लांट याचीही पाहणी केली. त्यांनतर महाविद्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील कोविड स्थिती, उपलब्ध खाटा, ऑक्सीजनची सद्यस्थिती जाणून घेतली.

गेल्या महिन्यापेक्षा आता कोरोनाबाधित रूग्णांमध्ये घट होत आहे, ही दिलासा देणारी बाब आहे, मात्र मृत्यूसंख्या आणखी कमी होण्यासाठी वैद्यकीय प्रशासनाने प्रयत्न करावे, अशा सूचना केल्या. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटत असली तरी नागरिकांनी मुखपट्टी, सामाजिक अंतर राखणे, हात वारंवार धुणे यासारख्या अत्यंत महत्वाच्या गोष्टींमध्ये खंड पडू देऊ नये, विनाकारण गर्दी टाळावी, शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन संजय राठोड यांनी केले. या भेटीवेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, अधीक्षक डॉ. सुरेंद भुयार, इएनटी विभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र गवार्ले, डॉ. सचिन गरनड, डॉ. शेंडे, डॉ. केशवाणी, पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे खासगी सचिव अशोक शिरसे, विशेष कार्य अधिकारी विजय राऊत, अधिपरिचारिका वनमाला राऊत, माया माघारे, प्रभा चिंचोळकर, अभ्यागत मंडळाचे सदस्य विकास क्षीरसागर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here