Home Breaking News संजय राठोड यांच्या प्रयत्नाने पोलीस दलास मिळणार पोर्टेबल ऑफिस कॅबिन…

संजय राठोड यांच्या प्रयत्नाने पोलीस दलास मिळणार पोर्टेबल ऑफिस कॅबिन…

65
0

यवतमाळ –जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस दल सतत कार्यशील असते. त्यातच बंदोबस्त, मोर्चे, व्हीआयपी दौरे या दरम्यान तर पोलिसांना क्षणभर विश्रांतीचीही उसंत नसते. हीच उणीव लक्षात घेऊन जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांनी पुढाकार घेऊन जिल्हा पोलीस दलासाठी विशेष बाब म्हणून २६ ‘पोर्टेबल आफिस कॅबिन’ घेण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा नियोजन समितीने नुकतीच या प्रस्तावास मान्यता दिली.
विविध सण, उत्सवांचे बंदोबस्त, मोर्चे, नेत्यांची सुरक्षा, रस्ते, चौक, महामार्गावर ड्युटी करत असताना पोलिसांना सतत ऊन, वारा, पावसात राहावे लागते. विश्रांती व आडोशासाठी हक्काचे ‍ठिकाण उपलब्ध राहत नसल्याने कुठेतरी आडोसा घ्यावा लागतो. महिला पोलीस कर्मचाऱ्यांची तर ड्युटी दरम्यान अधिक कुचंबना होते. पोलिसांची ड्युटी दरम्यान होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांनी मुंबई तथा महानगरात पोलिसांसाठी वापरात येत असलेल्या ‘पोर्टेबल ऑफिस कॅबिन’ची संकल्पना मांडली. या संदर्भात पोलीस अधीक्षकांना या संदर्भात प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या.
या प्रस्तावानुसार, जिल्हा पोलीस दलांतर्गत येणाऱ्या १० नगर परिषदांना प्रत्येकी दोन तसेच बंदोबस्ताकरीता सहा अशा २५ पोर्टेबल ऑफिस कॅबिन खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ७५ लाख ४३ हजार ६०० रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, आर्णी, वणी, पांढरकवडा, घाटंजी, उमरखेड व पुसद या १० नगरपरिषदांना प्रत्येकी दोन आणि वेळोवेळी येणाऱ्या व्हिव्हिआयपीय बंदोबस्त, आंदोलने, मोर्चे, धरणे, संप, रस्त्यावरील बंदोबस्त यासाठी सहा अशा २६ पोर्टेबल ऑफिस कॅबिन या निधीतून खरेदी करण्यात येणार आहे. या कॅबिन कुठेही हलविता येणार असल्याने पोलिसांसाठी सोईचे होणार आहे. बंदोबस्तादरम्यान फ्रेश होण्यासाठी या कॅबिनचा वापर करता येईल. या कॅबिनमुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी सोय होणार आहे.

बंदोबस्तावरील पोलिसांची गैरसोय दूर होईल –आ. संजय राठोड
मुंबई, पुणे आदी ठिकाणी बंदोबस्तावरील पोलिसांसाठी अशा कॅबिन आहेत. त्या नेहमी पाहण्यात येत होत्या. एकदा मुंबईत ही कॅबिन निरखून पाहली, तेव्हा आपल्या भागातील पोलिसांसाठीही अशी व्यवस्था असली तर त्यांना बंदोबस्तावरील ड्युटी अधिक सोईचे होईल, असे लक्षात आले. त्यामुळे असा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या होत्या. या कॅबिन खरेदीसाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच पोलिसांच्या ताफ्यात या फिरत्या ऑफिस कॅबिन येणार असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर होईल. पोलिसांसाठी आपल्या कार्यकाळात चांगले काम करू शकलो, याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया आ. संजय राठोड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here