Home Breaking News प्रभाग क्र १७ मधील पाईप लाईन, केबल टाकण्याचा भोंगळ प्रकार चांगल्या रस्त्यांची...

प्रभाग क्र १७ मधील पाईप लाईन, केबल टाकण्याचा भोंगळ प्रकार चांगल्या रस्त्यांची दुरवस्था सामाजिक कार्यकर्ते अंकुश पांडे यांची माहिती…

138
0

यवतमाळ : प्रभाग क्र १७ मधील रस्ते खराब झाले असुन आधी नगरपालिकने रस्त्यांची दुरुस्ती करायची व नवीन रस्ते तयार करायचे, त्यानंतर वीज, पाणी पुरवठा आणि दूरसंचार विभागाने केबल टाकण्यासाठी त्या नवीन रस्त्यांचे खोदकाम करायचे असा भोंगळ प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. एखाद्या चांगल्या रस्त्याची वाट कशी लावायची हे शासनाच्या विविध विभागांकडून शिकण्यासारखे आहे. मात्र, या प्रकाराने आता प्रभाग क्र १७ मधील सर्व नागरिक पुरते हैराण झाले असून, पुन्हा प्रभागातील अशा किती रस्त्यांची दुरवस्था करणार असा परखड सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रभागात विविध भागांमध्ये रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच पावसामुळे ज्या डांबरी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, अशांची डागडुजी करण्याचे कामही केले जात आहे. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजविल्याने त्या डांबरी रस्त्याची चांगली वाट लागली आहे तसेच लोकांना वाहतुकीसाठी ये-जा करणे धोक्याचे झाले आहे. अशाच रस्त्यांपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गार्डन चौक बस स्थानक कडे जाणारा मार्ग आहे. हा रस्ता सुस्थितीत असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ येथे वाढली होती. मात्र, अचानक जीवन प्राधिकरण विभागाने पाईप टाकण्यासाठी या रस्त्याच्या मध्यभागातून खोदकाम केले. यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला असून धोक्याचा होत आहे. तसेच प्रभागातील काही रस्ते खोदून बुजविण्यात देखील आले. परंतु या सर्व प्रकारामुळे त्याठिकाणी मातीचा उंचवटा तयार झाला आणि या चांगल्या रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली. परिणामी सुस्थितीमध्ये असलेला हे रस्ते काही क्षणात वाहतुकीसाठी अडचणीचे झाले आहे. प्रत्येक भागात असा भोंगळ कारभार केला जातो आणि आजही तो सुरूच आहे. प्रभागातील चांगल्या रस्त्यांची दुरावस्था करण्याच्या या प्रकाराकडे यवतमाळ नगर पालिकेनी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंकुश पांडे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

लाखोंची उधळपट्टी किती दिवस रस्त्यांची डागडुजी करणे तसेच नवीन रस्ता तयार करण्यापूर्वी केबल टाकण्याचे काम कधीही केले जात नाही. मात्र, एकदा रस्ता तयार झाला की मग अचानक वीज, पाणी पुरवठा व दूरसंचार विभागाला खडबडून जाग येते आणि त्यानंतर चांगल्या रस्त्याचे खोदकाम करणे सुरू होते. या सर्व कामांमध्ये लाखो रुपयांचा खर्च केला जात असून, ही पैशांची उधळपट्टी पुन्हा किती दिवस सुरू राहणार असाही सवाल प्रभाग क्र १७ मधील नागरिकांन मध्ये उपस्थित होत आहे.केबल टाकण्याच्या नावाने खोदकाम करून सुस्थितीत असलेले रस्ते खराब करण्याच्या प्रकारांमुळे यवतमाळ नगर पालिका, वीज, पाणी पुरवठा व दूरसंचार या विभागांमध्ये समन्वयच नाही ही बाब आता चव्हाट्यावर आली असून संबंधित विभागाने व नगर पालिका यवतमाळ यांनी लक्ष देण्याची गरज आहे.असे सामाजिक कार्यकर्ते अंकुश पांडे यांनी सांगितले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here