Home Breaking News यवतमाळात २०० खाटांचे नवीन जिल्हा रूग्णालय -संजय राठोड

यवतमाळात २०० खाटांचे नवीन जिल्हा रूग्णालय -संजय राठोड

126
0

कॅथलॅब, दोन पीएचसी, दिग्रस व वणी उपजिल्हा रूग्णालयांनाही मंजुरी.
यवतमाळ – यवतमाळ येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत २०० खाटांचे नवीन जिल्हा व सामान्य रूग्णालय उभारण्यास शासनाने नुकतीच मंजुरी दिली. यवतमाळ येथे या रूग्णालयासाठी प्रशासनाने तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी व तसा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा, अशी मागणी संजय राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
यवतमाळ येथे जिल्हा रूग्णालय व्हावे यासाठी आपण मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. संपूर्ण राज्यात केवळ १० जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हा रूग्णालयांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात यवतमाळचा समावेश आहे. त्यामुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यायावर येणार ताण नवीन जिल्हा रूग्णालयामुळे बऱ्यापैकी कमी होणार आहे, असे राठोड म्हणाले. महसूल राज्यमंत्री असताना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल मंजूर करून आणले होते. कोविड काळात हे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल कार्यान्वितही झाले. येथील अद्यायावत सुविधांचा लाभ हजारो कोरोना रूग्णांना झाला. मात्र कोरोना काळात आरोग्य विभागावर प्रचंड ताण आल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नव्यानेच निर्माण झालेले जिल्हा स्त्री रूग्णालय ही सर्व यंत्रणा अपुरी पडू लागली.
दरम्यान वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना अखिल भारतीय वैद्यकीय परिषदेच्या मानकानुसार शैक्षणिक प्रयोजनार्थ प्रत्येक विद्यार्थ्यामागे तीन खाटांचे प्रमाण असलेले शासकीय रूग्णालय असणे आवश्यक असते. येथील जिल्हा रूग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यरत असलेल्या पदांसह ही रूग्णालये हस्तांतरीत झाल्याने सार्वजनिक आरोग्य विभागापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. हाच धागा पकडून तत्कालीन यवतमाळ येथे जिल्हा रूग्णालय स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला, अशी माहिती संजय राठोड यांनी दिली आहे. पालकमंत्री असताना यासंदर्भात जिल्हाधिकारी, शल्य चिकित्सकांना नवीन जिल्हा रूग्णालयाबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने राज्यात मंजूर झालेल्या १० जिल्हा रूग्णालयांमध्ये यवतमाळच्या रूग्णालयाससुद्धा मंजुरी मिळाली आहे, असे ते म्हणाले. प्रारंभी १०० खाटांची मंजुरी मिळालेल्या या रूग्णालयासाठी आणखी १०० खाटांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सकांनी शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे लवकरच २०० खाटांच्या या रूग्णालयाचे काम येथे सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रूग्णालयाच्या निर्मितीसाठी राज्य शासनासह आशियाई विकास बँकेकडूनही निधी मिळाल्याची माहिती राठोड यांनी दिली. या मंजूर जिल्हा रूग्णालयासाठी १० ते १२ एकर शासकीय जमीन मिळावी, यासाठी प्रस्तावही देण्यात आला आहे. वाघापूर मार्गावरील शासनाच्या अखत्यारितील जमीन रूग्णालयासाठी देण्याबाबत महसूल विभागाकडून चाचपणी सुरू आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मंजूर करून दोन दिवसांत तसे आदेश देऊन या रूग्णालय निर्मितीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी संजय राठोड यांनी केली आहे.

कॅथलॅब, पीएचसी, उपजिल्हा रूग्णालयास मंजुरी
यासोबतच यवतमाळ येथे ‘कार्डियाक कॅथलॅब’ही मंजूर झाली आहे. साथरोगाची हाताळणी करण्यासाठी अद्यावत रूग्णालयासाठीसुद्धा यवतमाळला निधी देण्यात आला आहे. याशिवाय पाटण (ता. झरी), लोहारा (ता. यवतमाळ) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, दिग्रस व वणी येथे १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालयास सुद्धा मंजूर झाले आहे.

आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होईल
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व जिल्ह्यातून सर्व प्रकारचे रूग्ण येतात. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालाच्या यंत्रणेवरही ताण येतो. यवतमाळ येथे नव्याने जिल्हा (सिव्हील) रूग्णालय सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपण सातत्याने केली. ही मागणी मंजूर झाल्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. शिवाय वैद्यकीय महाविद्यालयाच्या यंत्रणेवरील ताण कमी होऊन यवतमाळात येणाऱ्या प्रत्येक रूग्णास हमखास उपचार मिळेल. नवीन सिव्हील हॉस्पीटल रूग्णांसाठी जीवनदायी ठरेल. आता जिल्हा प्रशासनाने या रूग्णालयाच्या जागेचा प्रस्तावा तातडीने मार्गी लावावा.
– संजय राठोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here