Home Breaking News धोका….तर…शेतकऱ्यांच्या हाती काहीच नाही लागणार ….

धोका….तर…शेतकऱ्यांच्या हाती काहीच नाही लागणार ….

43
0
जिल्हाभरात मुसळधार, पिकांना फटका; पैनगंगेकाठच्या गावांना धोक्याचा इशारा 
90 टक्क्यांहून अधिक झाली पावसाची नोंद, शेतशिवार जलमय
यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच असताना मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ९० टक्क्याहून अधिक पाऊस झाला असून,शेतशिवार जलमय झाला आहे. आणखी पाऊस पडल्यास शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही. विशेष म्हणजे पैनगंगा नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावून हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवला होता. मध्यंतरी काहीकाळ पावसाने दडी मारली होती, परंतू जुलै महिन्यापासून नियमित पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच छोटी, मोठी धरण ओव्हरफ्लो झाली आहे. तर जिल्ह्यातील अरूणावती, बेंबळा, अडाण, इसापूर आदी धरणातून पाण्याचा विसर्ग सुद्धा आतापर्यंत मोठ्या प्रमाणात झाला. तर छोटे, मोठे नाले सुद्धा ओसंडून वाहत आहे. मागील दहा ते बारा दिवसांपासून नियमित पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उडीद, मूग आदी पिकांच्या लागवडीचा खर्च सुद्धा निघालेला नाही. असे असताना मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. साधारणतः अडीच ते तीन तास जोरदार पाऊस झाल्याने शहरातील नाल्या ओसंडून वाहत होत्या. तर रस्तेसुद्धा जलमय झाले होते. अशात ग्रामीण भागातील छोटे, मोठे नाले सुद्धा ओसंडून वाहत असल्यामुळे हजारो हेक्टर मधील शेत शिवारात पाणी घुसले. शेतकऱ्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
इसापूर धरणाचे ९ गेट उघडले
पावसाने सर्वदुर थैमान घातले आहे. परिसरातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. त्यातच इसापूर धरणाचे ९ दरवाजे उघडल्यामुळे पैनगंगेने रौद्ररूप धारण केले आहे. परिणामी, गांजेगाव येथील विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या पूलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे विदर्भ -मराठवाडा दळणवळणाचा संपर्क तुटला आहे. मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच ढाणकी परिसरात पाऊस सुरू आहे.
इसापूर धारणातील पाण्याचा विसर्ग करण्यासाठी पैनगंगेच्या तीरावरील गावांना हिमायतनगर तालुक्यातील शिरफुली, डोलारी, पळसपूर, कोठा, वारंगटाकळी, तसेच विदर्भातील उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव, बोरी, चातारी, शिंदगी, गांजेगाव, सावळेश्वर, पिंपळगाव, मुरली, देवसरी आदी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत.
पैनगंगा नदीला येऊ शकतो मोठा पूर
इसापूर जलाशयामध्ये १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान ९९.४० टक्के, तर १ते १५ ऑक्टोबर या कालावधीत शंभर टक्के पाणीसाठा आवश्यक आहे. यापेक्षा जास्त पाणी धरणात आल्यास सांडव्याद्वारे पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात येते. त्यावेळी पैनगंगा नदीला पूर येऊ शकतो. म्हणून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले आहे.
सोयाबीनचे प्रचंड नुकसान
नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. परिणामी, मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनची लागवड करीत आहे. अशात जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा अडीच लाख हेक्टरहून अधिक आहे. मात्र, नियमित पावसामुळे सोयाबीनला फटका बसण्याची शक्यता आहे. मागील दहा बारा दिवसांचा पाऊस शेतकऱ्यांसाठी प्रचंड त्रासदायक ठरणार आहे.
महागाव तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान
गेल्या काही दिवसांपासून पावसाने तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने गुंज परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन पिकाला बसल्याने महसुल प्रशासनाने तत्काळ नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या श्रमाने फुलवलेल्या शेतीवर अस्मानी संकटाने प्रहार केला आहे. हाता तोंडाशी आलेल्या कापूस, सोयाबीन पिकाचे डोळ्या देखत मुसळधार पावसाने नुकसान होतांना पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. या पावसामुळे महागाव तालुक्यातील गुंज परिसरात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. तीन दिवस होऊनही कोरोनाच्या विळख्यामुळे पंचनामा करण्याची महसूल विभागाला वेळच मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी अश्या दोन्ही चक्रव्यूहात अडकला आहे. मुसळधार पावसामुळे गुंज, माळकिन्ही, माळेगाव, सवना, कान्हा, सारकिन्ही, हिवरा, खडका, मोहदी, पोखरी, वडद, ब्रम्ही, वागद इ सह इतर गावातील परिसरात सर्व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाने धुमाकूळ घातल्याने यात टमाटर, वांगे, काकडी, भाजीपाला सह भुईमूग, सोयाबीन, कापूस या पिकांचेही नुकसान झाले आहे. तर उसाला ही याचा फटका बसला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने सोयाबीन पिकाला कोंब आले अाहेत. पिके ५ ते ६ दिवसांपासून पाण्यात आहे. जवळपास ६० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती शेतकरी व्यक्त करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here