Home Breaking News महात्मा फुले चौकात ओबीसींचे धरणे

महात्मा फुले चौकात ओबीसींचे धरणे

44
0
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
यवतमाळ : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी गुरूवार, दि. ८ ऑक्टोबरला विविध संघटनांनी सामूहिक धरणे आंदोलन केले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये, राज्यातील रखडलेली नोकर भरती तातडीने सुरू करण्यात यावी, यासह विविध मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या.
राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून शासन स्तरावर हालचाली सुरू आहे. त्यांना ओबीसींचे आरक्षण देवू नये, यासाठी ओबीसीच्या विविध संघटनांनी एकत्र आल्या आहे. ओबीसींसह सर्वांची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्र शासनाने ही जनगणना न केल्यास राज्य शासनाने ती करावी, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे, न्यायालयीन व्यवस्थेमध्ये कोलेजीअम सिस्टिम नष्ट करून युपीएससीच्या धर्तीवर ऑल इंडिया ज्युडीशीअरी सर्व्हिसेस नेमण्याकरीता भारत सरकारला शिफारस करावी, राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयातील शिक्षकांच्या पद भरतीमध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या रिझर्व्हेशन इन टिचर्स कॅडर अॅक्ट २०१९ या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसींना ६, ९, ११, १४ टक्के वर्ग ३ व ४ च्या पदाकरीता आरक्षण आहे, अशा जिल्ह्यात ओबीसींसाठी १९ टक्के आरक्षण देण्यात यावे, ओबीसींसाठी निर्माण केलेल्या महा ज्योती संस्थेला एक हजार कोटी रुपयांची आर्थीक तरतूद करावी, ओबीसी विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती तातडीने द्यावी, वसतीगृह सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, आदी मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे, उत्तम गुल्हाणे, यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ओबीसी महासंघाची जिल्हा कचेरीवर धडक
ओबीसी समाजाची जातीय जनगणना करण्यात यावी, नॉनक्रिमीलेअरची घटनाबाह्य अट रद्द करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी परिषद आणि आरक्षण समर्थक कुणबी परिषदेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदीप वादाफळे, प्रा. प्रकाश फेंडर, रमेश ठाकरे, राजू देशमुख, रमेश गिरोळकर, अॅड. अमोल बोरखडे, संजय देशमुख, विजय हजारे, विवेक डेहणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here