Home Breaking News घाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण

घाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण

102
0

पैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त

घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्याला घाटंजी वाहतूक पोलिसाने मारहाण केली. गाडीतील भाजीपाला देखील सादर वाहतूक पोलिसाने रस्त्यावर ठेवायला सांगितला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तळणी येथील संदीप श्रीराम राठोड या शेतकऱ्याने नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील भाजीपाला घाटंजी येथील भाजी मंडीत विक्रीसाठी आणला. घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या गणेश आगे नामक वाहतूक पोलिसाने शेतकऱ्याची गाडी अडवून पैशाची मागणी केली.

वाहनातील भाजीपाला रस्तावर काढायला सांगितला. सदर पोलिसांचा हा नेहमीच शिरस्ता असल्याने गाडी चालकाने त्याला दोनशे रुपये दिले. शेतकरी संदीप राठोड यांनी सदर पोलिसाला नियमबाह्य कारवाई करू नका, शेतकरी अडचणीत आहेत. आम्ही कोणताही नियम तोडला नाही असे बोलल्यावर वाहतूक पोलीस गणेश आगे शेतकऱ्यावर संतापला.

अश्लील शिवीगाळ करून शेतकऱ्याची कॉलर पकडली. “तू मला नियम शिकवू नकोस” असे म्हणत त्याने शेतकरी संदीप राठोड यांना मारहाण केली. माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही. तू हवी त्यांच्याकडे तक्रार कर असा दम त्याने शेतकऱ्याला भरला.

हा वाहतूक पोलीस अनेक वर्षांपासून घाटंजी येथे कार्यरत आहे. गाड्या अडवून त्यांच्याकडून वसुली करणे व न दिल्यास त्यांना कार्यवाहीची धमकी देऊन शिवीगाळ करण्याबाबत गणेश आगे कुप्रसिद्ध आहे. ऑनड्युटी नसतांना अनेकदा गणवेश न घालता वाहनधारकांची अडवणूक करून पठाणी वसुली करण्यात ते पटाईत आहे अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. मात्र त्यांच्या दादागिरीमुळे कोणी तक्रार द्यायला पुढे येत नाही.

सदर शेतकऱ्याने घडलेला सर्व प्रकार महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांना सांगितल्यावर त्यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ याबाबत कळविले. पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांना या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मस्तवाल वाहतूक पोलीस गणेश आगे याची खातेनिहाय चौकशी करून त्याला बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी देवानंद पवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here