Home Breaking News मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी अडचणीत

मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी अडचणीत

54
0
कापुस वेचणीविना शेतशिवार झाले पांढरे शुभ्र
महागांव : पावसाच्या भीतीमुळे शेतात फुटलेला कापूस वेचणीची कामे एकाच वेळी सुरु झाली आहेत. परिणामी मजुरांची टंचाई जाणवत आहे. मजुरांची जुळवाजुळव करण्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . दुसरीकडे वेचणीअभावी अनेक शेतशिवार पांढरे शुभ्र झाल्याचे चित्र दिसत आहे.
महागांव तालुक्यात यंदा पावसाने पिकांना फटका बसल्यानंतर सध्या कापूस वेचणीसह सोयाबीन काढणीला वेग आला आहे. पावसाने शेती ओलाचिंब झाली होती त्यामुळे शेतातील कोणतीच कामे सुरु नव्हती. परंतु आता पाऊस उघडून जवळपास आठ दिवसांचा कालावधी झाल्याने शेत शिवार ही कोरडे पडत आहे. त्याचबरोबर  पुन्हा  परतीच्या पावसाचा फटका बसू नये यासाठी शेतकरी शेतातील कापूस वेचणीचे काम हाती घेत आहे. मजुरांअभावी वेचणी होणे शक्य नाही त्यामुळे आता शेत शिवार पांढरेशुभ्र झाल्याचे चित्र दिसत आहे. आता सर्वत्र कापसांची वेचणी करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्याचबरोबर सोयाबीनची काढणी व रब्बीच्या ज्वारी, गहू, हरभरा यांची पेरणी सुरू आहे. शेतीसह इतर कामाला वेग आला आहे. परिणामी शेतातील सर्वच कामे ठप्प झाली आहे. त्यातच या परिस्थतीत मजुरांची टंचाई जाणवत आहे. कापसाला वेचणीसाठी एका किलोकरिता सात ते आठ रुपये त्यातच मजूरांना घरी घेऊन जाण्यासाठी वाहनांच्या भाड्यांचादेखील खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर बाहेर गावाहून मजुरी देऊन मजूरांना घेऊन येण्यात येत आहे. त्यामुळे आधीच सततच्या पावसाने  शेतातील सोयाबीन, बाजरी, कापसाचे नुकसान झाले आहे अशा परिस्थतीत कपाशीची बोंडे फुटल्याने कापूस वेचणीला मजूर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतामधील कपाशीचे पीक खराब झालेले आहे. उरले सुरले कपाशीचे बोंडे आता फुटल्याने कापूस वेचणीकरिता मजूरदेखील मिळत नाही. त्यामुळे दररोज कपाशी वेचणीकरिता मजूर शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
– रमन कृष्णराव खाडे, शेतकरी, सवना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here