Home Breaking News अरेरे..नागरिकांच्या नाकातोंडात धुळ…आमदारांना रस्त्यांचे काम दिसत नाही का?

अरेरे..नागरिकांच्या नाकातोंडात धुळ…आमदारांना रस्त्यांचे काम दिसत नाही का?

149
0
जाणीवपूर्वक दूर्लक्ष : विकासकामांबाबत आमदारांची उदासिनता, तीस किमीचा रस्ता वाढवतो नागरिकांचा ‘ताप’
महागाव -पुसद रस्त्यावर नागरिकांचे हाल
तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे
महागाव :-
महागाव :- महागाव पुसद तीस किलोमीटरचा रस्ता गेल्या वर्षभरापासून नागरिकांना प्रचंड त्रासदायक ठरत आहे . अक्षरश: प्रवास करताना नागरिकांच्या नाकातोंडात धुळ जात आहे. अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दुचाकीवरून प्रवास करतांना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरून या परिसरातील तीन आमदार रोज कुठं ना कुठं दौरे करत असतात परंतु या रस्त्यामुळे जनतेचे होत असलेले हाल त्यांना कसे दिसत नाही असा प्रश्‍न पुढे येत आहे. पुसद विभागाचे तीन आणि महागाव उमरखेड विभागाचे आमदार असे मिळून चार आमदार असतांना या रस्त्याविषयी चुप्पी साधून का बसले आहेत? असा प्रश्‍न देखील जनमाणसातून विचारल्या जात आहे.
साधारणता बाराशे कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता गेल्या वर्षभरापासून अतिशय धीम्या गतीने सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी येऊन थातूरमातूर पाहणी करून जातात. भाजपाच्या कार्यकाळामध्ये ज्या कंत्राटदारांनी या रस्त्याचे कंत्राट मिळवले आहे तो कंत्राटदार कोणत्याही अधिकाऱ्यांना व येथील लोकप्रतिनिधीला जराही जुमानत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापासून पुसद पासून काटखेड्यापर्यंत हा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवण्यात आलेला आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेली गिट्टी आणि रोड च्या बाजूला खोदून ठेवण्यात आलेल्या भल्यामोठ्या नाल्या त्यामुळे अपघाताची मालिका रोजच सुरू आहे. त्यामुळे अनेकांना मणकेदुखी, पाठदूखी किरकोळ अपघात होऊन जखमी सुध्दा झाले आहेत. लोकप्रतिनिधी या तालुक्यातून दररोज ये-जा करीत असतात. मात्र, रखडलेल्या कामांचा शुभारंभ कधी करणार, हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरीत आहे. तातडिने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
संबधित विभागाचीही ‘डोळेझाक’
एक वर्षापासून रखडलेला रस्ता कधी पूर्ण होईल. काम होणार की नाही, याची शाश्‍वती तालुक्यातील नागरिकांना अजूनही वाटत नाही. महागाव, पुसद, उमरखेड या तिन विभागातील महत्त्वपूर्ण लोकप्रतिनिधींची या रस्त्यावरून नित्याचीच ये-जा असते. प्रवास करताना डोकेदुखी नित्याचीच झालेली आहे. तरीसुध्दा विकासकामांबाबत आमदारांना संबंधित विभागाला बोलावसं वाटत नसल्याचे दिसून येत आहे. एकंदरीतच नागरिक २१ व्‍या शतकातसुध्दा ३० किमीच्या रखडलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे ही एक शोकांतिका ठरणार आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here